पारनेर प्रतिनिधी - दि. २ जून २०२२६
चिंचोली या गावातील
सौरव उघडे या तरुणाने अतिशय बिकट परिस्थितीत स्वकर्तृत्वाने मेहनत आणि
परिश्रमाच्या जोरावर थेट देशाच्या आर्मीमध्ये स्थान मिळविले आहे. त्यांना
मिळालेल्या यशामुळे त्यांचे कुटुंब आणि गावकरी यांनी सौरवची थेट मिरवणूक काढत आनंद
साजरा केला.
भारत देश हा तरुणांचा
देश म्हणून ओळखला जातो. एका ठिकाणी देशातील एकंदरीत परिस्थिती पाहता आपल्या
भविष्याबद्दल फक्त चिंतेत असलेले तरुण आणि दुसऱ्या बाजूला आहे त्या परिस्थितीवर
मात करून स्वतःचे भविष्य घडवण्यात सतत प्रयत्नशील असलेला तरुण. संकट, आपदा आणि आपत्ती नवनवीन आव्हान घेऊन येत असतात. त्या
आव्हानाला परिस्थितीला छातीठोकपणे सामोरे जायचे असते. अशाच काही परिस्थितीशी दोन
हात करून यशाला खेचत आणणारा पारनेर तालुक्यातील चिंचोली गावचे सुपुत्र सौरव उघडे.
मोठे झाल्यावर आर्मीत
भरती होऊन देशसेवा करायची, असे स्वप्न मनाशी बाळगून सौरव यांनी चिंचोली गावातील जिल्हा परिषदेच्या
प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन पारनेरच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड
सायन्स कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. सौरवने स्वप्नाला गावसणी घालण्याच्या दिशेने
आपली वाटचाल सुरू केली होती. स्वप्न सत्यात उतरवताना त्यांना बऱ्याच संकटाचा
सामना करावा लागला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे बहुतेक वेळेस
सौरवला शेतात राबावे लागले. सौरवची आई शेतात काम करते आणि वडील माथाडी कामगार
आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोचिंग क्लासेस न लावता स्वतःच अभ्यास करत तयारी केली. यापूर्वी
सौरवने सलग तीन वेळेस प्रयत्न केले होते. परंतु, त्यांना यश आले नाही. सलग तीन वेळेस आलेल्या अपयशाने डगमगून
न जाता सातत्य ठेवले. परिणामी आज सौरवचे भारतीय सैन्यात नियुक्ती झाली.
सैन्यात नियुक्ती
झाल्याची बातमी कळताच आई वडील यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले.
उघडे कुटुंबीयांचा आनंद गगनात
मावेनासा झाला होता. काही क्षणात
सौरवच्या नियुक्तीची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. गावकरी उघडे कुटुंबाच्या
आनंदात सामील होत गावकऱ्यांनी सौरवची थेट मिरवणूक काढली. आनंदाच्या परिसिमा ओलांडत
लाल,
निळा गुलाल उधळत डिजेच्या तालावर सारा गाव थिरकू लागला.
या यशामागे माझे कुटुंब, नातेवाईक,मित्र परिवार आणि गावकरी यांचे आशीर्वाद होते म्हणून माझी
आज सैन्यात नियुक्ती झाल्याचे उदगार सौरव उघडे यांनी काढले.
यावेळी गावातील बुद्ध
विहारात सरपंच सतीश पिंपरकर यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सौरव यांचा सत्कार
करण्यात आला. तसेच संविधान प्रचारक सचिन नगरे यांनी संविधान प्रस्ताविकेची प्रतिमा
सौरव उघडे आणि बुद्ध विहाराला सप्रेम भेट म्हणून दिली. तसेच यावेळी जामगांवचे
सरपंच सुनील शिंदे, सामाजिक कार्यकर्ते बबन गायकवाड, बौद्ध महासभेचे जयवंत लव्हांडे, माजी सरपंच बाळासाहेब झंजाड आदी उपस्थित होते. कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी दुशांत सीताफळे, विक्रांत उघडे, प्रतिक लव्हांडे, रोहित
लव्हांडे,
प्रशांत उघडे, मयंक लव्हांडे, विशाल लव्हांडे, संदीप सीताफळे, ओंकार लव्हांडे इत्यादीने मेहनत घेतली. बंधू गौरव उघडे
यांनी उपस्थितांचे आभार मानले.
काही प्रतिक्रिया ---
“गुरे ओढणारा पोरगा माझा साहेब झाला... या गाण्याप्रमाणे
सौरवने त्याच्या भविष्याच्या दृष्टीने मोठी गरुड झेप घेतली आहे. मेहनत परिश्रम आणि
सातत्य ठेवल्याने यश आपल्या पदरात पडते हे आज सौरवने दाखवले. चिंचोली सारख्या एका
छोट्या गावातील मुलगा आज देशाच्या सैन्यात दाखल झाला आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”
-
सिताराम
लव्हांडे
(सामाजिक
कार्यकर्ते)
“सौरवने कठीण प्रसंगावर मात करत हे यश मिळविले आहे. त्याने
घेतलेल्या कष्टाचे आज चीज झाले आहे. सौरवचा आदर्श तरुणांनी घ्यावा. तसेच सौरवने
भविष्यात अजून पुढे जावे, पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!”
सचिन नगरे
(संविधान
प्रचारक)


0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.